नव्याने ५८ पक्षी प्रजातींच्या नोंदी

उत्खननामुळे त्यांच्या प्रजननावर संकट

    दिनांक :13-May-2026
Total Views |
वर्धा, 
Vardhet Navyane 58 Bird Species Nondi ग्लोबल बिग डे ९ मे या दिवशी असलेल्या जागतिक पक्षी गणनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील येळाकेळी, जामणी, पिपरी तसेच वर्धा शहर परिसरातील विविध अधिवासात केलेल्या पक्षी निरीक्षणात ५८ पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ई-बर्डच्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आल्या आहेत.वर्धा जिल्ह्याकरिता ई-बर्डनुसार दुर्मिळ असलेल्या बलाकचोच धीवर (स्टॉर्क-बिल्ड किंगफिशर) याची नोंद झाली. यात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या नागपूर विभागाचे विदर्भ समन्वयक राहुल वकारे यांनी सहभाग घेतला होता.
 
 
pakshi
 
वर्धेत नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय (रिवर टर्न), छोटा आर्ली (स्मॉल प्रटीनकोल), पेरते व्हा म्हणून आवाज देणारा पावश्या (कॉमन हॉक कुकू) तसेच हिवाळी स्थलांतरित छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग प्लोवर), लाल पुठ्ठ्याची भिंगरी (इस्टर्न रेड-रुम्पड श्वालो), रेषाळ कंठाची भिंगरी (स्ट्रीक-थ्रोटेड श्वालो) आढळले. राखी बगळा (ग्रे हेरॉन), हळदीकुंकू बदक (इंडिअन स्पॉट-बिल्ड डक) आणि काळा शराटी (ब्लॅक हेडेड आयबीस) या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
 
 
ग्रामीण भागातील तलावांवर मोठ्या प्रमाणात मुरूम व रेतीचे उत्खनन जेसीबीच्या सहाय्याने सुरू आहे. सध्या जमिनीवर घरटे करणार्‍या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असून त्याकरिता त्यांना सुरक्षित तलावाकाठील मोकळी सपाट जागेची आवश्यकता आहे. उत्खननामुळे त्यांच्या प्रजननावर संकट आले आहे. आनंदाची बातमी म्हणजे जामणी जवळील तलावामधील बेटावर नदी सुरय (रिवर टर्न) यांचे मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रजनन झाले.