विजय मिश्रांचे 'महासाम्राज्य' जन्मठेपेने कोसळले!

    दिनांक :13-May-2026
Total Views |
प्रयागराज,
Vijay Mishra's life sentence उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एकेकाळचे शक्तिशाली व्यक्तिमत्व आणि माजी आमदार विजय मिश्रा यांना खासदार-आमदार विशेष न्यायालयाने ४६ वर्षे जुन्या एका हत्या प्रकरणात कठोर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ फेब्रुवारी १९८० रोजी न्यायालयाच्या आवारातच प्रकाश नारायण पांडे नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावर अंतिम निकाल देताना न्यायालयाने विजय मिश्रा यांच्यासह इतर तीन आरोपींनाही दोषी ठरवत दंड आणि कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
 
 
Vijay Mishra up
 
न्यायाधीश योगेश कुमार (तिसरे) यांनी या खटल्याचा निकाल देताना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये विजय मिश्रा यांना जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंड सुनावला. यासोबतच, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी (कलम ३०७) त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची अतिरिक्त शिक्षा देण्यात आली आहे. विजय मिश्रा यांच्या व्यतिरिक्त जीत नारायण, संतराम मिश्रा आणि बलराम मिश्रा या इतर तीन आरोपींनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
हे प्रकरण १९८० मधील असून ३५ वर्षीय प्रकाश नारायण पांडे यांची भरदिवसा न्यायालयात हत्या झाल्याने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. मृताचे भाऊ श्याम नारायण पांडे यांनी कर्नल गंज पोलीस ठाण्यात या हत्येची तक्रार नोंदवली होती. विजय मिश्रा सध्या आग्रा तुरुंगात असून, जामिनावर असलेल्या इतर तीन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तात्काळ ताब्यात घेऊन तुरुंगात रवाना केले. या हायप्रोफाईल निकालानंतर न्यायालयाच्या आवारात आणि बाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर अखेर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.