मुंबई,
Ajit Pawar's biopic मराठी चित्रपटसृष्टीत वास्तववादी कथा आणि दमदार संवादांसाठी ओळखले जाणारे प्रवीण तरडेपुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘देऊळ बंद २’च्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भविष्यात राजकीय बायोपिक करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’नंतर जर पुन्हा एखाद्या नेत्यावर चरित्रपट करायचा झाला, तर तो अजित पवार यांच्यावरच असेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.एका मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे यांनी सांगितले की, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘धर्मवीर’च्या यशानंतर अनेक राजकीय नेते आणि पुढाऱ्यांकडून त्यांना बायोपिकसाठी ऑफर आल्या होत्या. काहींनी मोठ्या बजेटच्या ऑफर दिल्या, तर काहींनी कोरे चेक देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आपण केवळ पैशासाठी सिनेमा करत नसल्याचे सांगत त्यांनी अनेक प्रस्ताव नाकारल्याचा खुलासा केला.

तरडे म्हणाले की, कोणताही चित्रपट करण्यापूर्वी आपण स्वतःला एकच प्रश्न विचारतो — “मी हा विषय मनापासून करू शकतो का?” ‘धर्मवीर’ हा केवळ चित्रपट नव्हता, तर ती भावनिक जबाबदारी होती, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यानंतर पुन्हा एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वावर काम करण्याचा विचार नव्हता, पण अजित पवारांबद्दल मात्र वेगळं मत असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या काम करण्याच्या पद्धतीने आपण प्रभावित झालो असल्याचे सांगताना तरडे म्हणाले की, त्यांनी अजितदादांना जवळून काम करताना पाहिले आहे. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दिवसभर प्रशासनात सक्रिय राहणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, कामाचा वेग आणि सततचा ताण हा एका प्रभावी सिनेमाचा विषय होऊ शकतो, असेही प्रवीण तरडे यांनी सांगितले.