शिवसेना-भाजप संघर्षात विकास रखडला?

उपनगराध्यक्षांचे शांततेचे आवाहन

    दिनांक :14-May-2026
Total Views |
अंबरनाथ,
sadashiv-patil : अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेला राजकीय कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना आपसातील शत्रुत्व आणि वाद संपवण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या राजकीय वादाचा फटका शहराच्या विकासाला बसत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
sadashiv-patil
 
 
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू होत्या. अनेक विकासकामांच्या श्रेयवादावरून दोन्ही पक्षांत मोठी दरी निर्माण झाली होती. या संघर्षाचा परिणाम थेट पालिका प्रशासनावर आणि रखडलेल्या प्रकल्पांवर होताना दिसत आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले की, शिवसेना आणि भाजप हे राज्यात एकत्र काम करत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र विसंवाद पाहायला मिळत आहे.
 
सदाशिव पाटील यांनी स्पष्ट केले की, "शहराच्या प्रगतीसाठी युतीमधील नेत्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. जर आपण आपापसातच लढत राहिलो, तर अंबरनाथच्या नागरिकांच्या समस्या सोडवणार कोण?" त्यांनी दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थी करून हा तिढा सोडवण्याची विनंती केली आहे.
 
अंबरनाथमधील या राजकीय नाट्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता पाटील यांच्या या आवाहनानंतर शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते नमती भूमिका घेतात की वाद आणखी पेटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.