सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का!

आनंद परांजपे यांचा राजीनामा

    दिनांक :14-May-2026
Total Views |
मुंबई,
Anand Paranjpe's Resignation महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे-पालघर पट्ट्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि महत्त्वाचे नेते आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आनंद परांजपे यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत दिली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १४ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. 'जड अंतःकरणाने हा प्रवास थांबवत असून नव्या वाटेवर नवीन सुरुवात करत आहे,'असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
sunetra pawar
 
परांजपे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस, प्रवक्ता तसेच ठाणे आणि पालघर जिल्हा समन्वयक या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेसाठी संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आनंद परांजपे हे सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र नंतर त्यांनी आव्हाडांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घेतल्याने ठाणे आणि पालघरमधील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, तसेच राज्यातील बदलते राजकीय समीकरण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.