मुंबई,
cng prices hike मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात ₹२ प्रति किलोने वाढ जाहीर केली असून, नवीन दर आता ₹८४ प्रति किलो झाला आहे. यापूर्वी सीएनजीचा दर ₹८२ प्रति किलो होता. नवीन दर तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण एमएमआर परिसरातील वाहनचालकांना याचा थेट परिणाम जाणवणार आहे.
सीएनजी दरवाढीमुळे दररोज गॅसवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणाऱ्या लाखो नागरिकांच्या खर्चात वाढ होणार आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या खिशावर याचा अतिरिक्त भार पडणार आहे. आधीच इंधन आणि दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, आता सीएनजीच्या दरवाढीने चिंता आणखी वाढली आहे.
महानगर गॅस लिमिटेडकडून या दरवाढीमागील कारणांबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमती आणि पुरवठा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या वाढीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या भाड्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.cng prices hike सीएनजी हे पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त इंधन मानले जात असल्याने अनेक वाहनचालकांनी गेल्या काही वर्षांत सीएनजीकडे वळण घेतले होते. मात्र वारंवार होणाऱ्या दरवाढींमुळे आता नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.