विठूनामाचा गजर! आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार प्रस्थान

    दिनांक :14-May-2026
Total Views |
पुणे,
ashadhi-wari-schedule-announced : वारकरी संप्रदायाचा प्राण असलेल्या आषाढी वारीचा मार्ग आता मोकळा झाला असून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा ८ जुलै रोजी दुपारी ठीक तीन वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-माऊली'च्या जयघोषात माऊलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी या १७ दिवसांच्या भक्तिमय प्रवासाची सविस्तर माहिती दिली आहे. या नियोजनानुसार, पालखी सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल आणि २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
 
 
ashadhi-wari-schedule-announced
 
 
 

पुणे आणि सासवडमधील मुक्काम

 

आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर ९ आणि १० जुलै असे दोन दिवस माऊलींची पालखी पुणे शहरात मुक्कामी असेल. पुण्याचा पाहुणचार घेऊन ११ जुलै रोजी पालखी सासवडकडे मार्गस्थ होईल आणि ११ व १२ जुलै असे दोन दिवस सासवडमध्ये मुक्काम करेल. त्यानंतर भक्तीचा हा प्रवाह पुढे सरकत १३ जुलैला जेजुरीची गड जेजुरी आणि १४ जुलैला वाल्हे येथे विसावेल. १५ जुलै हा दिवस वारकऱ्यांसाठी खास असेल, कारण या दिवशी नीरा स्नान करून पालखी लोणंदच्या दिशेने कूच करेल.

 

रिंगण सोहळ्यांचा थरार आणि 'बंधू भेट'

 

वारीतील आकर्षणाचे केंद्र असलेले रिंगण सोहळे १६ जुलैपासून सुरू होतील. १६ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे पहिले 'उभे रिंगण' पार पडेल आणि पालखी तरडगावला मुक्कामी पोहोचेल. त्यानंतर १७ जुलैला फलटण, १८ जुलैला बरड आणि १९ जुलैला नातेपुते असा वारीचा प्रवास राहील. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले 'गोल रिंगण' पार पडल्यानंतर पालखी माळशिरसमध्ये विसावेल. २१ जुलैला खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल आणि पालखी वेळापूरला पोहोचेल. २२ जुलै रोजी ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे अत्यंत भावूक असा 'बंधू भेट' सोहळा संपन्न होईल. त्या रात्री पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असेल.

 

पंढरीचा प्रवेश आणि एकादशी

 

वारीच्या शेवटच्या टप्प्यात २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे अशा दोन्ही रिंगणांचा भव्य सोहळा पाहायला मिळेल, त्यानंतर पालखी वाखरी येथे विसावेल. अखेर २४ जुलै रोजी आषाढ दशमीच्या मुहूर्तावर माऊलींची पालखी पंढरपूर नगरीत प्रवेश करेल. यंदाच्या वारीत एकूण ४ गोल आणि ३ उभ्या रिंगणांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे वारीचा उत्साह द्विगुणित होणार आहे. २५ जुलै रोजी लाखो वारकरी चंद्रभागेत स्नान करून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतील आणि वारीची सांगता होईल.