भोंदू बाबाशी मैत्री भोवली! IAS अधिकारी निलंबित

राज्य सरकारची मोठी कारवाई

    दिनांक :14-May-2026
Total Views |
मुंबई,
ashok-kharat-case : भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांना अखेर राज्य सरकारने निलंबित केले आहे. एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
 
 
 
ias
 
 
अशोक खरात या भोंदू बाबावर फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान, अभिजीत भांडे-पाटील हे या बाबाच्या संपर्कात असल्याचे आणि त्याला विविध कामात मदत करत असल्याचे पुरावे समोर आले होते. सरकारी पदाचा गैरवापर करून एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पाठबळ दिल ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात भांडे-पाटील यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यांच्या आणि खरात याच्यातील संभाषणाचे रेकॉर्ड्स आणि काही आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. सनदी अधिकाऱ्याने अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवणे हे सेवा नियमांचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि गृह विभागाने निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली.
 
या निलंबनामुळे प्रशासनातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सविस्तर चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत भांडे-पाटील निलंबित राहतील. या कारवाईमुळे 'भोंदूगिरी'ला खतपाणी घालणाऱ्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.