ओमान,
Attack on Indian Ship in the Strait of Hormuz होर्मुझ सामुद्रधुनीजवळील ओमानच्या सागरी हद्दीत भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्यामुळे मोठी घटना घडली आहे. गुजरातहून निघालेले आणि 'हाजी अली' नावाचे हे जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळ प्रवास करत असताना अचानक स्फोटासारखा आवाज ऐकू आला आणि काही क्षणांतच जहाजाला भीषण आग लागली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच जहाजावरील सर्व १४ भारतीय खलाशांनी ओमानच्या तटरक्षक दलाच्या मदतीने लाईफबोटच्या साहाय्याने जहाज सोडले आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
भारत सरकारने केला निषेध
या घटनेनंतर काही वेळातच जहाज समुद्रात बुडाल्याचे समोर आले आहे. हे जहाज सोमालियाहून शारजाकडे जात असल्याची प्राथमिक माहिती असून, ओमानच्या सागरी क्षेत्रात ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत इराण आणि पश्चिम देशांमधील तणाव वाढत असताना या घटनेमुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे आणि नागरी खलाशांचे जीव धोक्यात घालणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मात्र या हल्ल्यामागे कोण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ओमान प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, जहाजावरील सर्व खलाशी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली असून, त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्यात आली आहे. संबंधित यंत्रणा त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी समन्वय साधत असल्याचेही सांगण्यात आले आहे.