बोगस बियाणे जप्त करणार्‍या अधिकार्‍यांचा आ. बकानेंनी केला सत्कार

    दिनांक :14-May-2026
Total Views |
देवळी, 
Bogus Seeds Seized नाचणगाव परिसरात कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुतरित्या राबविलेल्या धडक कारवाईत तब्बल १८ लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले. शेतकर्‍यांच्या हितासाठी धाडसी व प्रभावी कारवाई करणार्‍या संबंधित अधिकारी आणि पोलिसांचा आ. राजेश बकाने यांच्या हस्ते सिद्धेश्वर देवस्थान, नाचणगाव येथे सत्कार करण्यात आला.
 
 
bakane
 
याप्रसंगी आ. बकाने म्हणाले की, प्रतिबंधित बियाणे, बनावट खत आणि कृषी क्षेत्रातील अवैध व्यवसायामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाने वेळेत कारवाई करून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान टाळले असून ही कारवाई कौतुकास्पद आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही आ. बकाने यांनी यावेळी दिला. भविष्यातही अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. शासन आणि प्रशासनाने प्रामाणिकपणे काम केल्यास शेतकर्‍यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही आ. बकाने यांनी नमूद केले.
 
 
Bogus Seeds Seized  यावेळी आ. राजेश बकाने यांनी कृषी विभागाचे जिल्हा मोहीम अधिकारी संदीप ढोणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रमोद पेटकर, देवळीचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महेश पालवे तसेच पुलगावचे पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. कार्यक्रमाला देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर, नगरसेवक संतोष भोयर, जिपचे माजी सदस्य विनोद माहुरे, माजी उपसभापती किशोर गव्हाळकर, भाजपा मंडळ अध्यक्ष जयश्री मोकदम, प्रभाकर ढोक, शुभांगी कासार, गजानन राऊत, श्रीकांत बोबडे, प्रेम साहू, राहुल गायकवाड, नीलिमा गावंडे, विस्तार अधिकारी बिडवाईक, ग्रामविकास अधिकारी लोखंडे यांच्यासह नाचणगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.