- एसीबीच्या कामात अडथळा भोवला
गोंदिया,
Bribery Case लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या गोपनीय कारवाईत सहकार्य करण्यास नकार देत शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, गोंदिया येथील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक तथा प्रभारी उपअधीक्षक उमाकांत उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी एका लोकसेवकाविरुद्ध लाच मागणीची तक्रार Bribery Case लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे दाखल झाली होती. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये तातडीने कारवाई करण्यासाठी शासन नियमांनुसार शासकीय पंच-साक्षीदारांची आवश्यकता होती. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, गोंदिया येथून वर्ग-३ चे दोन कर्मचारी पंच म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत पत्र देण्यात आले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी आरोपी अमित रमेश पवार (४५), वरिष्ठ लिपिक यांची पंच म्हणून नियुक्ती करून त्यांना लेखी आदेशाद्वारे लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आरोपी अमित पवार यांनी कार्यालयात उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार देत तेथून निघून गेले आणि त्यानंतर आपला मोबाईलही बंद ठेवला. वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशन रामनगर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.