काळीज पिळवटले! लेकीच्या 'बिदाई'पूर्वीच वडिलांचा जगाला 'निरोप'

    दिनांक :14-May-2026
Total Views |
बुलढाणा,
brides-father-dies-of-heart-attack : ज्या हातांनी लाडक्या लेकीचे कन्यादान करून तिला सुखी संसाराचा आशीर्वाद द्यायचा, त्याच पवित्र क्षणी एका पित्यावर काळाने झडप घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात लग्नाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, वधूच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या अकल्पित संकटामुळे सनई-चौघड्यांच्या सुरात सुरू असलेल्या लग्नमंडपाचे रूपांतर काही क्षणांतच शोककळेत झाले.
 

dies
 
 
 
मंगल विधी ठरला अखेरचा
 
वरदडी येथील कुरुमदास कुंडलिक भुतेकर (वय ५०) यांच्या मुलीचा, नंदिनीचा विवाह जालना जिल्ह्यातील प्रदीप नानोटे यांच्याशी निश्चित झाला होता. बुधवारी (१३ मे) सायंकाळी लग्नाचे सर्व विधी उत्साहात सुरू होते. मंगलाष्टका पार पडल्यानंतर कन्यादानाचा अत्यंत भावूक विधी सुरू झाला. कुरुमदास हे आपल्या मुलीचे कन्यादान करत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळा सुरू झाल्या आणि ते जागीच कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती.
लेकीच्या बिदाईपूर्वीच वडिलांचा निरोप
 
कुरुमदास भुतेकर यांचे आपल्या मुलीचे लग्न थाटात करण्याचे स्वप्न होते. त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून लग्नाची सर्व तयारी केली होती. हळदीपासून ते लग्नाच्या मुख्य विधीपर्यंत सर्व काही आनंदाने पार पडले, मात्र नियतीचा डाव काही वेगळाच होता. मुलीची पाठवणी करण्यापूर्वीच जन्मदात्या पित्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला. ज्या घरातून मुलीची डोली निघणार होती, त्याच घरातून वडिलांची अंत्ययात्रा निघाल्याने उपस्थित वऱ्हाडी आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
 
गावावर शोककळा
 
कुरुमदास भुतेकर हे गावातील एक मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण वरदडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला नवदाम्पत्याच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असताना, दुसऱ्या बाजूला पित्याचे छत्र हरपल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण हाच तिच्यासाठी सर्वात मोठे दुःख देणारा ठरला.