नाशिक,
CBI's suspicions point to NTA केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)कडून सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता मोठे आणि धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासाची दिशा आता थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएसीकडे वळल्याचे दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनटीएमधीलच एखादी अंतर्गत व्यक्ती संवेदनशील माहिती बाहेर पुरवत असल्याचा संशय सीबीआयला आहे. या प्रकरणात जयपूर, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरसह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान नाशिकमधील शुभम खैरनार, अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडे, जयपूरमधील मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्राममधील यश यादव यांना अटक करण्यात आली आहे. इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या एका पथकाने दिल्लीतील एनटीए कार्यालयात तब्बल दहा तास तपास केल्याची माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणेला पेपरफुटीमागे एक संघटित आणि नियोजनबद्ध रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून, बिहारस्थित टोळीच्या भूमिकेचीही पुन्हा नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकमधील एका वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन केंद्राचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आरोपी शुभम खैरनार गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत होता. त्याच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या पद्धतीने प्रवेश मिळवून दिला जात होता, याची सखोल चौकशी आता सुरू आहे. या तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीट परीक्षा रद्द करण्यामागे राजस्थानमधील सीकर येथे वितरित करण्यात आलेल्या कथित ‘गेस पेपर’चीही मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. या गेस पेपरमधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. विशेषतः रसायनशास्त्र विषयातील अनेक प्रश्न जुळल्याने संशय अधिक गडद झाला आणि अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.