क्युबावर 'अंधारयुग'! वीज यंत्रणा कोलमडली; संपूर्ण देश अंधारात

    दिनांक :14-May-2026
Total Views |
हवाना,
cuba-total-blackout : क्युबा सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. देशातील वीज पुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, देशाच्या ऊर्जा मंत्र्यांनी थेट टीव्हीवर लाईव्ह येऊन "आमच्या हातात आता काहीही उरलेले नाही," अशी कबुली दिली आहे. या 'टोटल ब्लॅकआउट'मुळे क्युबातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
cuba-total-blackout
 
 
 
क्युबातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अनेक दिवसांपासून देशात विजेचा लपंडाव सुरू होता, परंतु गुरुवारी ग्रिड पूर्णपणे निकामी झाल्याने संपूर्ण बेटाचा वीज पुरवठा खंडित झाला. ऊर्जा मंत्री व्हिसेंटे डी ला ओ लेव्ही यांनी सरकारी वाहिनीवर माहिती देताना सांगितले की, यंत्रणा पूर्ववत करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. इंधनाची टंचाई आणि जुनाट झालेली यंत्रणा यामुळे हे संकट अधिक गडद झाले आहे.
 
या वीज संकटामुळे क्युबातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांना जनरेटरच्या मदतीने वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, इंधनाचा साठा मर्यादित असल्याने तिथेही मर्यादा येत आहेत. रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी शहरांमध्ये शांतता आणि अंधार पसरलेला आहे.
 
क्युबाच्या सरकारने या परिस्थितीसाठी अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध आणि इंधनाच्या किमतीत झालेली वाढ यांना जबाबदार धरले आहे. निर्बंधांमुळे वीज प्रकल्पांसाठी लागणारे सुटे भाग आणि इंधन आयात करणे कठीण झाले आहे. सध्या सरकार इतर देशांकडून मदतीची अपेक्षा करत आहे, परंतु वीज पुरवठा कधी पूर्ववत होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.