नेपाळमध्ये प्रवेशासाठी आता 'क्यूआर कोड' अनिवार्य

बालेन शाह सरकारचा निर्णय चर्चेत

    दिनांक :14-May-2026
Total Views |
काठमांडू
Decision of Balen Shah नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नव्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे भारत-नेपाळ संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान बालेन शाह यांनी सत्तेत आल्यानंतर शेजारी राष्ट्रांबाबत समान धोरण राबवण्याची घोषणा केली होती. मात्र, अलीकडील काही निर्णयांचा सर्वाधिक परिणाम भारतावर होत असल्याची चर्चा आता सीमावर्ती भागांमध्ये सुरू झाली आहे.काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारने भारतातून नेपाळमध्ये नेल्या जाणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. सीमावर्ती व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले गेले.
 
 
Decision of Balen Shah
भारतीय बाजारपेठेतून कमी दरात वस्तू खरेदी करून नेपाळमध्ये विक्री केली जात असल्याने स्थानिक व्यापारावर परिणाम होत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला होता. त्यानंतर १०० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तूंवर कर लागू करण्यात आला. दरम्यान, आता नेपाळ सीमा शुल्क विभागाने आणखी काही नवे नियम लागू केले आहेत. भारतातून नेपाळमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला आता वैध ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासोबतच वाहनांची ऑनलाइन नोंदणी करून QR कोड स्कॅन करणे आणि अस्थायी वाहन परवानगी प्रक्रिया पूर्ण करणेही आवश्यक करण्यात आले आहे.
 
 
या नव्या प्रक्रियेमुळे सीमावर्ती भागातील नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः भारत-नेपाळ सीमावर्ती भागात राहणारे नागरिक दररोजच्या व्यवहारांसाठी सीमा ओलांडतात. त्यामुळे या नव्या नियमांचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याची चर्चा सुरू आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, आधीच अतिरिक्त शुल्कामुळे व्यापार मंदावला होता, त्यात आता नव्या नोंदणी प्रक्रियेमुळे मालवाहतूक आणि पर्यटन क्षेत्रालाही फटका बसू शकतो. पर्यटकांसाठीही अधिक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया लागू झाल्याने नेपाळ दौरा पूर्वीइतका सोपा राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.