दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात NIAची मोठी कारवाई

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi bomb blast case दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयात तब्बल ७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात १० आरोपींविरोधात गंभीर आरोप ठेवण्यात आले असून स्फोटामागील दहशतवादी कटाचा तपशील तपास यंत्रणेकडून समोर आणण्यात आला आहे. या भीषण स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण राजधानी हादरली होती. एनआयएच्या तपासानुसार, सर्व आरोपी कथितपणे अन्सार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ही संघटना अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंटशी संलग्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. तपास यंत्रणेने आरोपपत्रात जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी डॉ. उमर उन नबी यांना मुख्य आरोपी म्हणून नमूद केले आहे. ते हरियाणातील फरिदाबाद येथील एका विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आल्याचेही एनआयएने म्हटले आहे.
 

Delhi bomb blast case 
 
तपासादरम्यान विविध राज्यांमध्ये छापेमारी करून मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करण्यात आले. आरोपपत्रात शेकडो कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि जप्त साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. तपास यंत्रणेनुसार, आरोपी कट्टर जिहादी विचारसरणीने प्रभावित होते आणि त्यांनी देशात मोठा दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे.एनआयएच्या मते, आरोपींनी नवीन सदस्यांची भरती करणे, स्फोटके तयार करणे आणि शस्त्रसाठा उभारणे यासारख्या कारवायांवर काम सुरू केले होते. तपासात काही प्रतिबंधित शस्त्रे आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही आरोपी विविध प्रकारच्या आयईडी आणि इतर स्फोटक तंत्रज्ञानावर प्रयोग करत असल्याचाही दावा तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.