*बक्षीस वितरण 5 जून रोजी
* सहभागी होण्याचे प्र-कुलगुरू डॉ. कावळे यांचे आवाहन
चंद्रपूर,
Essay Competition गोंडवाना विद्यापीठाच्या ‘चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समिती’च्या वतीने येत्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी व नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा विषय ‘चंद्रपूर व परिसरातील प्रदूषण आणि नागरिकांची भूमिका’ हा असून, बक्षीस वितरण 5 जून रोजी चंद्रपुरात होणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी दिली. पत्रपरिषदेला अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सल्लागार परिषद सदस्य तथा प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य संदीप पोशट्टीवार, सिनेट सदस्य तथा प्रकल्पाचे प्रस्तावक संजय रामगिरवार, समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. राजीव वेगीनवार, ‘सिबीएससी’च्या शरयू कुबेर, समन्वयक प्रा. निखिल बांगडे प्रभृती उपस्थित होते.
डॉ. कावळे म्हणाले, परिसरातील सामाजिक समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा, या हेतुने आम्ही चंद्रपूर व परिसरातील प्रदुषण आणि आरोग्य समस्येवर कार्य करण्याचे ठरवले आहे. या कार्यात आम्हाला ईको-प्रो, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, ग्रीन प्लॅनेट सोसायटी आदी संस्था सहकार्य करणार आहेत. या कार्यासाठी एक समिती गठित करण्यात आली असून, त्या समितीमार्फत येत्या काळात विविध उपक्रम राबविले जातील. याच मांदियाळीतील एक कार्यक्रम म्हणजे, निबंध स्पर्धा आहे. ही स्पर्धा जशी विद्यार्थ्यांसाठी असेल, तशीच ती नागरिकांसाठीही खुली असणार आहे.
या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत स्वीकारल्या जातील. मर्यादा 1000 शब्दांची असेल. ही स्पर्धा 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, बारावीनंतरच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी खुले अशा तीन गटात होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिकही तीन गटात वेगवेगळे असेल. पहिले पारितोषिक 5000 रूपये, द्वितीय 3000 व तृतीय पारितोषिक 2000 आणि प्रोत्साहन पारितोषिक 1000 रूपये तसेच सहभागी सर्व स्पर्धकांसाठी विद्यापीठाचे प्रमाणपत्र असणार आहे.
Essay Competition स्पर्धेच्या प्रवेशिका चंद्रपुरातील जनता महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, डॉ. खत्री महाविद्यालय आणि दै. तरूण भारत कार्यालयात जमा करता येईल. येत्या 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्पर्धकांना प्रवेशिका सादर कराव्या लागतील किंवा प्रवेशिका ऑनलाईन पध्दतीनेही संबंधित लिंकवर जाऊन अपलोड करता येणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. कावळे यांनी केले आहे.