शेतकर्‍यांची महावितरण कार्यालयावर धडक

    दिनांक :14-May-2026
Total Views |
खंडित वीजपुरवठ्याने फळबागा संकटात
 
कारंजा लाड, 
Farmers Storm Mahavitaran तालुयातील कामरगाव सर्कल अंतर्गत येणार्‍या उंद्री धरण परिसर, टाकळी, बेंबळा आणि आसपासच्या शेतशिवारातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून तीव्र वीज समस्येला सामोरे जात आहेत. कृषी पंपांना पुरेशा दाबाने आणि नियोजित वेळेत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. परिणामी संत्रा, हळद, लिंबू तसेच इतर फळबाग आणि नगदी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत.
 
 
shetakari
 
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. मात्र वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने अनेक शेतकर्‍यांच्या विहिरी, बोअरवेल आणि कृषी पंप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अखेर संतप्त शेतकर्‍यांनी कामरगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक देत आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या.शेतकरी मोठ्या आशेने कार्यालयात पोहोचले असता तेथे सहाय्यक अभियंता रजेवर असल्याचे समजले. यामुळे शेतकर्‍यांचा संताप अधिकच वाढला. विशेष म्हणजे, शेतकर्‍यांच्या तक्रारींची अधिकृत नोंद घेण्यासाठी आवश्यक असलेली तक्रार नोंदवही व तक्रार बुकदेखील कार्यालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब यावेळी समोर आली. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी यावेळी अधिकार्‍यांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी अधिकारी नसतील, तक्रार नोंदविण्याची व्यवस्था नसेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित केला.
 
 
Farmers Storm Mahavitaran रात्री-अपरात्री वीज येत असल्याने शेतीचे नियोजन कोलमडल्याचे सांगितले. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने मोटारी सुरू होत नसल्याची तक्रारही करण्यात आली.यावेळी सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी पुढाकार घेत वरिष्ठ अभियंता अधिकार्‍यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत शेतकर्‍यांचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच संबंधित भागातील तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून शेतकर्‍यांना नियमित वीज देण्यात यावी, अशी मागणही त्यांनी केली. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली.
वीज समस्या तातडीने न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. आता महावितरण प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.