‘तेजस्विनी’चे संचालक बेपत्ता : शिंदे कुटुंब संशयाच्या भोवऱ्यात
यवतमाळ,
यवतमाळात तेजस्विनी कोऑपरेटिव्ह वुमन सोसायटीच्या माध्यमातून Financial Fraud आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुंतवणूकदारांना सुमारे 10 कोटी रुपयांचा चुना लावून संचालक मंडळ बेपत्ता झाले आहे. या पतसंस्थेवर कारवाई करून प्रशासक बसवण्यात आला, पण कारवाई मात्र थंडपणे सुरू असल्याची माहिती प्रभाकर सोनटक्के व इतर ठेवीदारांनी गुरुवार, 14 मे रोजी पत्रपरिषदेत दिली.
पुढे बोलताना सोनटक्के म्हणाले, या प्रकरणात संस्थेचा संस्थापक प्रमोद सुधाकर शिंदे याच्यासह संपूर्ण संचालकांवर गंभीर आरोप आहेत. त्यात प्रमोद शिंदे, श्रद्धा प्रमोद शिंदे, जयश्री अनिल बिजवे, नेहा अतुल साबळे, कंचन संजय शिंदे, आंचल आकाश तेलंग, गंगा संतोष वानखडे, दुर्गा नीलेश तेलंग, वनिता प्रेमसिंग पवार, पूनम नेत्रदीप दुधे, प्रीती संदीप टाके, पल्लवी जीवन शिंदे, हेमा पंकज गाडबैले आणि लीना निलकंठ मरसकोल्हे यांचा समावेश आहे. या पतसंस्थेने गुंतवणूकदारांना तब्बल 24 टक्के परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या. अल्पावधीत जास्त नफ्याच्या आशेने अनेक नागरिकांनी आयुष्यभराची बचत या संस्थेत गुंतवली. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे परत देण्याऐवजी संस्थेचे कार्यालय बंद करून सर्व संचालक बेपत्ता झाले.
या प्रकरणात नियमबाह्य कारभारालाही खतपाणी घातल्याचे दिसून आले. सहायक निबंधक अनिल नाईक यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 6 एप्रिलला या पतसंस्थेवर प्रशासक म्हणून ओंकार पहुरकर यांची नियुक्ती झाली आहे. यानंतर 16 एप्रिल रोजी प्रशासकांनी ‘तेजस्विनी’चा पंचनामा केला. यावेळी सहाय्यक निबंधक निनावे, लेखा परीक्षक गुघाणे उपस्थित होते. पंचनामा करून कार्यालयाचे कुलूप उघडून पाहणीसुद्धा केली आहे. या संदर्भात उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची पीडितांनी भेट घेतली असता त्यांनी वर्ष 23-24 व 24-25 चे ऑडिट केल्याचे सांगून त्यात फक्त 1 कोटी रुपयांचा व्यवहार असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी वर्ष 25-26 च्या ऑडिटबद्दल सॉफ्टवेअर बंद असल्यामुळे आम्ही कुठलीही कारवाई करू शकत नसल्याचे सांगितले.
तपासणीत, जळगावच्या कंपनीकडून प्रमोद शिंदे यांनी खरेदी केलेले सॉफ्टवेअर थकबाकीमुळे बंद असल्याचे समोर आले. सुमारे 1.35 लाख रुपये न भरल्याने सॉफ्टवेअर बंद करण्यात आले आहे. तसेच वायफायसुद्धा बंद असल्याने डेटाची तपासणी अपूर्ण राहिल्याची माहिती मिळाली. याशिवाय, संस्थेकडून कोणतीही वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सहकारी विभागाच्या देखरेखीतच हा गैरप्रकार सुरू होता का, असा प्रश्न पीडितांकडून विचारला जात आहे. प्रशासक नियुक्त होऊन 25 दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गुंतवणूकदार संतप्त आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली नसल्याचेही त्यांची माहिती आहे.
Financial Fraud दरम्यान, प्रमोद शिंदे याच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. त्यामुळे शिंदे कुटुंब संशयाच्या भोवèयात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर ठेवीदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करावी, तसेच ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावे, अशी या पीडितांची अपेक्षा आहे. या संदर्भात न्याय न मिळाल्यास 1 जूनपासून उपोषण आंदोलन करण्यात येईल आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ठेवीदार व कर्मचाèयांनी दिला आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पत्रपरिषदेला या पतसंस्थेचे पीडित ठेवीदार अमोल वगारे, रवी मिश्रा, संध्या सोनटक्के, जगदीश अटल, प्रियांका लंगोटे, सर्वेश नवाडे आदी उपस्थित होते.