‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार

    दिनांक :14-May-2026
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा
पाणी, चाराचे नियोजन करा
 
अमरावती, 
Impact of El Nino ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होऊ शकणार्‍या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा आज बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील पाणी टंचाई, जलसंधारण, शेती आणि चार्‍याच्या उपलब्धतेबाबत विविध विभागांकडून सद्यस्थिती जाणून घेत आगामी काळातील उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार उपस्थित होते. ‘एल निनो’मुळे पाणी प्रभावीत होणार आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी जिल्ह्यातील पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
 
 
nino
 
जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अभियानाची सद्यस्थिती, तलाव आणि नाल्यांमधील गाळ काढणे, कालवा दुरुस्ती, चेक डॅमची कामे आणि नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व जलसंधारण कामांचे मॅपिंग करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई लक्षात घेऊन पाणी पुरवठा करणार्‍या यंत्रणांनी नियोजन करावे. ग्रामीण भागात टंचाईवर मात करण्यासाठी सार्वजनिक बोअरवेलवर सोलर पंप बसवण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने उपयोगात आणावे. शहरी भागात नळजोडणीची तपासणी करून पाणीगळती तात्काळ दुरूस्त करण्यात यावी. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कळविण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
 
 
Impact of El Nino सिंचनासाठी पाण्याचा वापर करताना सूक्ष्म नियोजन करावे. कालवा दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावेत. कृषी विभागाने शेतीसाठी पाण्याचे नियोजन करावे. पीक विम्याची सद्यस्थिती आणि शेततळ्यांच्या कामांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी चार्‍याची कमतरता भासू नये, यासाठी चार्‍याची सद्यस्थिती तपासून आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबत पशूसंवर्धन विभागाने जुलैपर्यंत चार्‍याचे नियोजन करण्यात आले आहे. पुरेसा चारा उपलब्ध होणार आहे. तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
 
 
जलसंधारणाच्या कामातून भूजल पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. प्रामुख्याने रिचार्ज शाफ्टच्या कामाचे नियोजन करावे. तसेच नवीन बोअरवेलच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रोजगार हमी योजनेतून ’गाव तिथे जलसंधारण कामे’ राबवली जाणार आहेत. यात प्रामुख्याने शेततळे, पाझर तलाव, नाला खोलीकरण आणि गाळ काढणे, तसेच बोअरवेल आणि विहीर पुनर्भरणाची कामे हाती घेण्यात यावी. वन विभागानेही पाणी साठविण्यासाठी जागा निवडून कामे सुरू करावीत, असे निर्देश देण्यात आले.