वर्माच्या कपाळी कर्णधारपदाचा ‘तिलक’

श्रीलंका दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघ जाहीर

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India 'A' Squad Announced for Sri Lanka Tour आयपीएल 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच भारतीय क्रिकेटमध्ये पुढील आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी हालचालींना वेग आला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा करण्यात आली असून या संघाचे नेतृत्व युवा फलंदाज तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रियान पराग याच्याकडे देण्यात आली आहे. या निवडीमुळे युवा खेळाडूंना मोठी संधी मिळणार असून भविष्यातील भारतीय संघाची दिशा ठरवण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.
 
 
 
tilak varma captain
 
 
या दौऱ्यात भारत ‘अ’ संघासोबत श्रीलंका ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ हे संघ देखील सहभागी होणार आहेत. तीन संघांमध्ये रंगणारी ही वनडे ट्राय सीरिज 9 जूनपासून सुरू होणार असून 21 जून रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोन-दोन सामने खेळेल आणि त्यानंतर गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये अंतिम लढत होईल.भारत ‘अ’ संघात अनेक युवा आणि आक्रमक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशीसारख्या स्फोटक फलंदाजाचा समावेशही या संघात करण्यात आला आहे. आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. तसेच प्रियांश आर्य, आयुष बडोनी आणि प्रभसिमरन सिंग यांसारख्या फलंदाजांनाही संघात स्थान मिळाले आहे.
 
 
गोलंदाजी विभागातही तरुणाईला प्राधान्य देण्यात आले असून यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान यांना संधी देण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन बहुदिवसीय कसोटी सामनेही होणार आहेत, ज्यासाठी स्वतंत्र संघाची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. मात्र सध्या लक्ष वनडे ट्राय सीरिजवर केंद्रीत आहे, जिथे युवा भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय अनुभव मिळण्याची महत्त्वाची संधी मिळणार आहे.