मुख्यमंत्री बुलेटवरून आले अन् मंत्री चालत निघाले!

महाराष्ट्र सरकारचा इंधन बचतीवर भर

    दिनांक :14-May-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra Government Emphasizes Fuel Conservation महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले. नेहमी मोठ्या सुरक्षा ताफ्यासह प्रवास करणारे मुख्यमंत्री यावेळी बुलेट मोटरसायकलवरून विधान भवनात दाखल झाले. त्यांच्या या अनोख्या प्रवासाची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. इंधन बचत आणि सरकारी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, नितेश राणे यांनीही इंधन बचतीचा संदेश देत मंत्रालयात पायी जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाजवळच सरकारी निवासस्थान असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चालत मंत्रालय गाठले. त्यामुळे नेहमी त्यांच्या ताफ्यात दिसणारी अनेक वाहने यावेळी अनुपस्थित होती.

फडणवीस 
दरम्यान मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, विविध शासकीय विभागांनाही पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, पुढील सहा महिन्यांत कोणतेही मोठे सरकारी कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, साताऱ्यात आधीच नियोजित असलेला कार्यक्रम हा शेवटचा मोठा सरकारी कार्यक्रम असेल. त्यानंतर खर्च आणि इंधन बचतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. अनावश्यक परदेश दौरे रद्द करण्यात आले असून, प्रशासनाला साधेपणाचा आदर्श ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.बुलेटवरून विधान भवनात येण्यामागील कारण स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेतल्यास त्याचा सकारात्मक संदेश समाजात जातो. इंधन बचतीसोबतच साधेपणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.