कोलकाता,
Mamata's Black Robe and the High Court पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी मोठी घडामोड पाहायला मिळाली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या काळा कोट परिधान करून कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल झाल्या. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेवर त्या स्वतः न्यायालयासमोर भूमिका मांडणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सुजॉय पॉल यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. ही याचिका टीएमसीशी संबंधित वकील आणि नेते कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र शिरसान्या बॅनर्जी यांनी दाखल केली आहे. निवडणुकीनंतर राज्यातील विविध भागांत घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर आणि कथित अनियमिततेवर या याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान ममता बॅनर्जी निवडणूक प्रक्रियेतील अनेक मुद्द्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ममता बॅनर्जी सातत्याने निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. टीएमसीकडून निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत असून, मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्यात आल्याचाही दावा पक्षाने केला आहे. मतमोजणी प्रक्रियेवरही टीएमसीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील अनेक भागांत हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांवर लक्ष्यपूर्वक हल्ले होत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेकडे राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत २०७ जागांवर विजय मिळवला, तर टीएमसीला ८० जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुकीतील पराभवानंतरही ममता बॅनर्जी यांनी आपण पराभूत झालो नसल्याचे सांगत आपली भूमिका कायम ठेवली आहे.