ममतांच्या वकिलीची बार कौन्सिलने मागितली कुंडली

    दिनांक :14-May-2026
Total Views |
कोलकाता,
Mamata's lawyer's Bar Council पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि न्यायालयीन वर्तुळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका उपस्थितीमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीनंतर झालेल्या कथित हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी त्या स्वतः कलकत्ता उच्च न्यायालयात हजर राहिल्या. विशेष म्हणजे त्यांनी वकिलांचा काळा कोट परिधान करून न्यायालयात प्रवेश केला, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत आणि कायदेशीर अधिकारांबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात ममता बॅनर्जी यांनी न्यायालयासमोर पक्षाची बाजू मांडताना निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा मांडला. त्यांच्या मते, या घटनांमध्ये पक्ष कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले असून, महिला, मुले आणि अल्पसंख्याकांवरही अत्याचार झाल्याचा दावा त्यांनी केला. या परिस्थितीत न्यायालयाने हस्तक्षेप करून पीडितांना संरक्षण द्यावे आणि विस्थापित झालेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली.
 
 
Mamata
 
दरम्यान, त्यांच्या न्यायालयातील उपस्थितीनंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राज्य बार कौन्सिलकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ममता बॅनर्जी या अधिकृतपणे नोंदणीकृत वकील आहेत का, त्यांचा नोंदणी क्रमांक काय आहे, तसेच मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी वकिलीचा सराव थांबवला होता का किंवा नंतर पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती परवानगी घेतली होती का, याबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे.या घडामोडींमुळे कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात चर्चा वाढली असून, कलकत्ता उच्च न्यायालयानेही संबंधित प्रकरणात विस्थापित झालेल्या नागरिकांच्या सुरक्षित पुनर्वसनाबाबत आवश्यक निर्देश दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीत कायद्याची पदवी असूनही या प्रकरणामुळे त्यांच्या वकिली अधिकारांबाबत नवीन वाद निर्माण झाला आहे.