छ, संभाजीनगर,
Meraj Khan Arrested छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएमचे नगरसेवक मेराज खान यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात त्यांना मदत केल्याच्या आरोपावरून एका शाळेचे मुख्याध्यापक इलियास कादिर सिद्दिकी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोघांनाही १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणा उलगडा एका जुन्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासादरम्यान झाला. पोलिसांकडून संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू असताना काही शालेय नोंदी संशयास्पद आढळल्या. त्यानंतर अधिक चौकशी करण्यात आली असता, मेराज खान यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात केवळ दोन मुलांचा उल्लेख केल्याचे समोर आले. मात्र प्रत्यक्षात त्यांना तीन मुले असल्याची माहिती तपासात उघड झाली.
तपास यंत्रणांच्या मते, तिसऱ्या मुलाची माहिती लपवण्यासाठी बनावट बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. या प्रमाणपत्रात संबंधित मुलाला मेराज खान यांच्या भावाचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. हे कागदपत्र तयार करण्यात शाळेच्या मुख्याध्यापकांनी मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी करत असून आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.