रिसोड,
NEET Paper Leak Scam देशातील लाखो तरुणांचे भवितव्य ठरवणार्या नीट-यूजी २०२६ परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या गंभीर प्रकारामुळे परीक्षा प्रणालीच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रिसोड विधानसभा प्रमुख तथा माजी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली आहे.
यावेळी बोलताना सानप म्हणाले की, प्रवेश परीक्षांच्या सचोटी आणि पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. जर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका काही ठराविक लोकांपर्यंत पोहोचत असतील तर हा केवळ तांत्रिक बिघाड नाही तर तो संपूर्ण परीक्षा प्रणालीवर झालेला आघात आहे. वर्षभर दिवस-रात्र मेहनत करून परीक्षेची तयारी करणार्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर हा मोठा अन्याय आहे.पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून पात्र विद्यार्थ्यांचे स्वप्न उध्वस्त केले जात असल्याचे सानप यांनी नमूद केले.
NEET Paper Leak Scam या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेवर चौकशी व्हावी. एक संसदीय समिती स्थापन करून चौकशीची व्याप्ती वाढवावी.जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा करणार्यांना पाठीशी घालू नका. त्यांच्या भविष्याशी खेळणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असा इशाराही विश्वनाथ सानप यांनी दिला आहे.