शहानूरची जलवाहिनी फुटली
पथ्रोट,
Pathrot's Water Supply शहानूर धरणावरून पथ्रोट गावाला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. गावात येणारी मुख्य जलवाहिनी मधातच फुटली व गावाचा चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे गावकर्यांना उष्माघाताच्या या वातावरणात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जलवाहिनीची दुरुस्ती कधी होते व पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; कारण त्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता कधी साहित्याची, कधी मजुरांची, कधी तांत्रिक उपकरणांची कमतरता भासत आहे. पण ग्रामपंचायतजवळ दक्षता म्हणून कोणतेही उपाय नाही, त्यामुळे या सर्व कामात वेळ जातो आहे. गावाला ९० हजार लिटर पाण्याचा पुरवठा या जलवाहिनीद्वारे होत असतो; पण अचानकपणे शहानून कालव्यालगत असलेल्या जरीना शेतशिवाराच्या भागात मागील चार दिवसापासून पाईपलाईनला गळती लागली आहे.
Pathrot's Water Supply या गळतीची माहिती मिळताच ग्रामपंचायतचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जेसीपीद्वारे खोदकाम करून गळतीची तपासणी केली परंतु मुख्य जलवाहिनीवर गळती असल्याचे लक्षात आले. ती दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मशीनरी व जेसीबीसारखी यंत्रसामुग्री आवश्यक असल्याची बाब दुरुस्ती करणार्या कर्मचार्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार यंत्रसामुग्री उपलब्ध करून मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतकडून कधी व कशी सुरुवात होईल, हे सध्या तरी अनिश्चित आहे. अशातच आधीच उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यातच गळतीमुळे सर्वदूर निर्माण झालेल्या पाणीटंचाईने हाहाकार उडाला आहे. शहानूर धरणावरून ठिकठिकाणी तांत्रिक बाबी लक्षात घेऊन एअर व्हाल्व्ह लावण्यात आले आहे. जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू असताना याच व्हाल्व्हच्या माध्यमातून पाण्याच्या दबावावर नियंत्रण ठेवल्या जाते, परंतु मागील काही दिवसापासून जलवाहिनीवरील एअर व्हाल्व्ह अचानकपणे बिघडले आहे, त्यामुळेच जलवाहिनीवरील पाण्याचा दबाव वाढला व गळती झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. काम युद्धपातळीवर सुरू असून ते पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे ग्रामपंचायत अधिकारी राजू खोजरे यांनी सांगितले.