- प्रधानमंत्री आवास योजनेत सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम
गोंदिया,
PM Awas Yojana ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणार्या ’प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला सलग चौथ्यांदा मिळत असून, जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.
PM Awas Yojana या दैदीप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी उद्या १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्री यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, यावेळी गोंदिया जिल्ह्याला सन्मानित केले जाईल. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांना निमंत्रित केले आहे. जिल्हा स्तरावर गोंदियाने प्रथम क्रमांक मिळवला असतानाच, विभागीय स्तरावरही नागपूर विभागाने आपली छाप सोडली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत कोकण आणि नाशिक नंतर नागपूर विभागाने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभाग राज्यात प्रथम ठरला आहे. सलग चौथ्या वर्षी मिळालेल्या या ऐतिहासिक यशामुळे गोंदिया जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात गाजत असून, या कामगिरीबद्दल प्रशासकीय वर्तुळातून आणि सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सर्वांचे महत्वपूर्ण योगदान : भेंडारकर
सलग चौथ्या वर्षी राज्यात अव्वल स्थान मिळवणे ही मोठी जबाबदारी आहे. भविष्यातही ही यशाची परंपरा कायम राखण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू. या यशामागे लाभार्थ्यांचा विश्वास, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि प्रशासनाची कार्यक्षमता यांचे मोठे योगदान आहे. गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या अभियानात योगदान देणार्या सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो अशा मत गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.