नवी दिल्ली,
Politics over Rahul Gandhi's foreign tours लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका सुरू केली आहे. गेल्या दोन दशकांत राहुल गांधी यांनी केलेल्या विदेशी दौऱ्यांचा खर्च नेमका कुणी केला, असा सवाल भाजपने उपस्थित करत राजकीय वातावरण तापवले आहे. भाजपचे नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या दौऱ्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. संबित पात्रा यांनी दावा केला की, राहुल गांधी गेली २२ वर्षे निवडून आलेल्या पदावर असून या काळात त्यांनी विविध देशांचे ५४ परदेश दौरे केले आहेत. इटली, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, व्हिएतनाम, सिंगापूर, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांच्या भेटींची माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या दौऱ्यांसाठी निधी कुठून आला, याची माहिती समोर आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपच्या दाव्यानुसार, राहुल गांधींच्या प्रत्येक दौऱ्यात तीन ते चार जणांचा ताफा असतो आणि या सर्व दौऱ्यांवर एकूण सुमारे ६० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पात्रा यांनी म्हटले की, २०१३-१४ ते २०२२-२३ या काळातील उत्पन्नाच्या तपशीलानुसार राहुल गांधींची कमाई सुमारे ११ कोटी रुपये होती. त्यामुळे इतक्या मोठ्या खर्चासाठी निधी नेमका कुठून आला, हा प्रश्न उपस्थित होतो.यावेळी भाजपने एफसीआरए आणि आयकर कायद्याचाही मुद्दा उपस्थित केला. परदेश दौऱ्यांसाठी एखाद्या विदेशी संस्थेकडून निधी मिळाला असेल, तर त्याची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक असल्याचे पात्रा यांनी सांगितले. तसेच, जर हा वैयक्तिक खर्च असेल, तर त्याची आयकर विभागाकडे नोंद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या इंधन बचत, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परदेश दौरे कमी करण्याच्या आवाहनावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. सरकारच्या धोरणांवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी हे आवाहन म्हणजे सरकारच्या अपयशाचे लक्षण असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्या परदेश दौऱ्यांचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला आहे.