सुरक्षारक्षकांना चकवा देत जन्मठेपेचा कैदी पसार

    दिनांक :14-May-2026
Total Views |
पुणे,
prisoner escapes from Yerwada पुण्यातील येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जनार्दन शंकर आडसुळे असे फरार झालेल्या कैद्याचे नाव असून तो भवानी पेठ परिसरातील काशेवाडी येथील रहिवासी आहे. आडसुळे याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहात चांगले वर्तन असल्यामुळे त्याची येरवडा येथील खुल्या कारागृहात बदली करण्यात आली होती. खुल्या कारागृहात तो शेतीसंबंधित काम करत होता.
 
 

Yerwada 
 
१२ मे रोजी कामावर असताना त्याने सुरक्षारक्षकांची दिशाभूल करत कारागृहातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कारागृह प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी कारागृह प्रशासनाचे अधिकारी चंद्रकांत सयाजी खांदवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, येरवडा कारागृहातून कैदी फरार होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. याआधी ८ मे रोजी संतोष लक्ष्मण भिंगारे नावाचा आणखी एक जन्मठेपेचा कैदी कारागृहातून पळून गेला होता. सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील रहिवासी असलेल्या भिंगारेचा अद्यापही शोध लागलेला नाही. सलग दोन कैदी फरार झाल्यामुळे कारागृह प्रशासनाची कार्यपद्धती आणि सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, येरवडा पोलीस फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातून तपास करत असून शहरासह आसपासच्या भागात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.