उत्तर प्रदेशात वादळ-पावसाचा तांडव; ८९ जणांचा मृत्यू

    दिनांक :14-May-2026
Total Views |
लखनौ,
Rain Wreak Havoc in Uttar Pradesh उत्तर प्रदेशात आलेल्या भीषण वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार माजला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराज, भदोही, कानपूर देहात, फतेहपूरसह अनेक भागांमध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, घरांचे नुकसान झाले तर शेतीपिकांनाही मोठा फटका बसला आहे. परिस्थिती गंभीर होताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला अलर्ट मोडवर ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित नागरिकांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
 
 

Rain Wreak Havoc in Uttar Pradesh 
 
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभावित कुटुंबांची भेट घेऊन तातडीने मदतकार्य सुरू करावे, असे आदेशही मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत. राज्यातील जीवितहानी, पशुधन आणि मालमत्तेच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून २४ तासांच्या आत आर्थिक मदत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आयुक्त कार्यालयाकडून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन बचाव आणि पुनर्वसन कार्यावर देखरेख करण्यास सांगण्यात आले आहे. वादळ आणि पावसामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.