बारामती,
Response to Baramati Janata Darbar जय पवार यांच्या जनता दरबाराला बारामतीत मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. अजित पवारांच्या शैलीतच लोकांशी संवाद साधत प्रश्न जाणून घेणे आणि तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याने बारामतीकरांमध्ये “अजितदादांनंतर आता जयदादा” अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या जय पवार यांनी दर गुरुवारी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सकाळपासूनच नागरिकांनी राष्ट्रवादी भवनात गर्दी केली. विविध शासकीय अडचणी, स्थानिक प्रश्न आणि वैयक्तिक समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी जय पवार यांनी थेट संवाद साधला. अनेक प्रश्नांवर तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी जय पवारांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. अजित पवारांप्रमाणे सहज उपलब्ध राहणारे आणि लोकांशी थेट संपर्क ठेवणारे नेतृत्व मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेला हा दुसरा जनता दरबार असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळेही जय पवार चर्चेत आले आहेत. पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले असून, राष्ट्रीय सचिव आणि शिस्त पालन समिती प्रमुखपदासोबत आर्थिक जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षातील पुढील पिढीच्या नेतृत्वात जय पवारांची भूमिका अधिक मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.