EPFO कडून ७ कोटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट

PF चे टेन्शन मिटले! आता निवृत्तीचे पैसे मिळणार "ऑटोमॅटिक"

    दिनांक :14-May-2026
Total Views |
मुंबई,
EPFO : देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता पीएफ काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान करत आहे. नव्या निर्णयानुसार, निवृत्तीनंतरचे पैसे काढण्यासाठी किंवा नोकरी सोडल्यानंतर अंतिम सेटलमेंट करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया आता 'ऑटोमॅटिक' म्हणजेच स्वयंचलित होणार असून, पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेगाने जमा केले जातील.
 

epfo 
 
 
 
काय आहे नवीन बदल?
 
सध्या ईपीएफओमध्ये केवळ आजारपण, शिक्षण किंवा लग्नासारख्या कारणांसाठी 'अॅडव्हान्स' पीएफ काढण्याची सुविधा ऑटो-मोडवर उपलब्ध आहे. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे क्लेम अवघ्या ३ दिवसांत मंजूर होतात. मात्र, आता हीच वेगवान सुविधा निवृत्तीनंतरच्या अंतिम सेटलमेंटसाठीही लागू केली जाणार आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा एखादा कर्मचारी निवृत्त होईल किंवा नोकरीचा राजीनामा देईल, तेव्हा त्याच्या क्लेमची पडताळणी मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे केली जाईल. यामुळे पूर्वी महिनाभर लागणारा वेळ आता अवघ्या काही दिवसांवर येणार आहे.
 
नोकरी बदलताच पीएफ होणार ऑटो-ट्रान्सफर
 
केवळ पैसे काढणेच नाही, तर नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफर करण्याची डोकेदुखीही आता संपणार आहे. ईपीएफओने 'ऑटो-ट्रान्सफर' यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. आता जेव्हा तुम्ही जुनी नोकरी सोडून नव्या कंपनीत रुजू व्हाल, तेव्हा तुमचा पीएफ डेटा नवीन खात्यात आपोआप ट्रान्सफर होईल. यासाठी वेगळा फॉर्म भरण्याची किंवा जुन्या कंपनीकडे पाठपुरावा करण्याची गरज उरणार नाही. या पारदर्शक आणि वेगवान प्रक्रियेचा फायदा देशातील सुमारे ७ कोटी पीएफ सदस्यांना होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने ईपीएफओचे हे पाऊल कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास वाचवणारे ठरेल.