राजकीय क्षेत्रात खळबळ
रिसोड,
Risod Municipal Council रिसोड नगर परिषदेच्या राजकारणात मंगळवारी एकच खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक ५-ब मधील नगरसेवक बंडू रामकिसन वानखेडे व प्रभाग क्रमांक १०-अ मधील नगरसेविका शितल बंडू वानखेडे यांना जिल्हाधिकार्यांनी तिसर्या अपत्याच्या कारणावरून अपात्र ठरवले आहे. गोपाल बंडू वानखेडे हे त्यांचे तिसरे अपत्य असल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाल्याने जिल्हाधिकार्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
Risod Municipal Council नगर परिषद निवडणुकीत बंडू वानखेडे यांनी १३९ मतांनी पवन छित्तरका यांचा तर शितल वानखेडे यांनी २७९ मतांनी अंजली यशवंत देशमुख यांचा पराभव केला होता. मात्र, महाराष्ट्र नागरी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. याच मुद्याचा आधार घेत पराभूत उमेदवार पवन छित्तरका आणि अंजली यशवंत देशमुख यांनी जिल्हाधिकार्यांकडे दाद मागितली होती. त्यांनी गोपाल वानखेडे हे तिसरे अपत्य असल्याचे आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे प्रशासनासमोर सादर केले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांची सखोल पडताळणी करण्यात आली. अखेर जिल्हाधिकार्यांनी वानखेडे दाम्पत्याला दोषी धरत त्यांचे नगरसेवक पद तात्काळ प्रभावाने रद्द केले. विशेष म्हणजे, हे दोन्ही नगरसेवक आमदार अमित झनक यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे या निर्णयाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयामुळे रिसोडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता हे दाम्पत्य या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार का? आणि रिक्त झालेल्या या जागांवर पोटनिवडणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.