‘हिंदी-रूसी भाई भाई’

भारताच्या ऊर्जा गरजांसाठी रशिया कटिबद्ध;

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Russia Committed to India's Energy Needs रशियाने जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा दिला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जगभरात इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली असताना, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारताच्या ऊर्जा गरजांवर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘हिंदी-रूसी भाई भाई’ हा केवळ घोषवाक्य नसून दोन्ही देशांच्या सांस्कृतिक आणि भावनिक नात्याचे प्रतीक असल्याचेही लावरोव यांनी नमूद केले. त्यांनी राज कपूर यांच्या चित्रपटांचा उल्लेख करत, आजही रशियामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल मोठा आदर असल्याचे सांगितले.
 
Energy Needs
भारत आणि रशियामधील संबंध हे केवळ रणनीतिक भागीदारीपुरते मर्यादित नसून, दीर्घकालीन विश्वास आणि मैत्रीवर आधारित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लावरोव यांनी सांगितले की, रशिया भारताला आवश्यक असलेला तेल, गॅस आणि कोळशाचा पुरवठा अखंडपणे सुरू ठेवेल. जागतिक बाजारातील स्पर्धा किंवा इतर देशांच्या दबावामुळे भारत-रशिया करारांवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संभाव्य ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
 
 
भारत-रशिया सहकार्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे शिल्पकार असलेल्या लावरोव्ह यांनी विशेष उल्लेख केला. तामिळनाडूमधील या अणुऊर्जा प्रकल्पाच्या नवीन युनिट्सच्या उभारणीसाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रशियन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. मोदी हे जगातील अत्यंत ऊर्जावान आणि प्रभावी नेत्यांपैकी एक असून, भारताची आर्थिक, संरक्षण आणि तांत्रिक स्वायत्तता मजबूत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. भारत दौऱ्यादरम्यान लावरोव हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. तसेच ब्रिक्स आणि जी-२० अंतर्गत सहकार्य, व्यापार, ऊर्जा, विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवरही दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे.