उपविभागीय कृषी अधिकारी वाळके यांचे आवाहन
कारंजा लाड,
'Satyamev Jayate Farmer Cup' competition शेतकर्यांसाठी एक मोठी आणि प्रेरणादायी संधी उपलब्ध झाली असून सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. आधुनिक शेती, उत्पादन वाढ, संघभावना आणि नियोजन कौशल्य यांच्या जोरावर शेतकर्यांना केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे तर लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले आहे.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणार्या विजेत्या टीमला तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविणार्या टीमला ५ लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय विविध स्तरांवर लाखोंची इतर आकर्षक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यभरातील शेतकर्यांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या टीमसह या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग, उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळविणे, तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेती यांसारख्या बाबींवर या स्पर्धेमध्ये भर दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या शेतकर्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनुभवी मार्गदर्शकांचे मेंटॉरशिप सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. सहभागी टीमला योग्य नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन, पीक व्यवस्थापन, बाजारपेठेचे नियोजन आणि स्पर्धेतील कामगिरी सुधारण्यासाठी विशेष मदत केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
'Satyamev Jayate Farmer Cup' competition ग्रामीण भागातील शेतकर्यांना प्रगत शेतीकडे वळविणे, शेतीमधून अधिक आर्थिक लाभ मिळवून देणे आणि तरुणांना शेतीकडे आकर्षित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १५ मे ही या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकर्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.