हिंगणघाट,
हिंगणघाट शहराने महाराष्ट्राला अनेक दिग्गज कलावंत दिले. त्यातच बहुप्रतिभावान Shair Pranay Sutlej शायर प्रणय सतलज. त्यांच्या लेखणीने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आंबेडकरी गीतांना नवी दिशा, नवा आवाज आणि नवा आत्मविश्वास दिला आहे. प्रणय सतलज यांचे मूळ नाव प्रणय चरणदास खोब्रागडे. लहानपणापासूनच शब्दांवर प्रेम करणार्या प्रणय यांना शायरीची ओढ होती. त्यांच्या आयुष्याला पहिली दिशा मिळाली ती प्रसिद्ध आंबेडकरी गायक सरवर जानी यांच्या सहवासातून. नागपूर येथे शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचा परिचय आंबेडकरी साहित्य आणि चळवळीशी झाला. राष्ट्रीय प्रबोधनकार, गायक प्रकाशनाथ पाटणकर यांच्या सहवासात त्यांनी समाजभान जपणारी गीते लिहायला सुरुवात केली. संघर्ष, वेदना, स्वाभिमान आणि परिवर्तन यांचा आवाज त्यांच्या गीतांतून उमटू लागला. एक कट चहावर अनेक रात्री जागवत त्यांनी शब्दांची साधना केली आणि आपल्या कष्टाच्या बळावर मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
महानायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, डॉ. उत्कर्ष शिंदे, आल्हाद शिंदे आणि राहुल शिंदे यांनी गायलेल्या गीतांनी सामाजिक जाणीव अधिक तीव्र केली. आयकॉनिक स्टार राहुल साठे आणि सागर साठे यांच्या संगीताने प्रणय यांच्या गीतांना नवा आयाम मिळाला. नामांकित गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक त्यांच्या शब्दांना आवाज देऊ लागले. मास्टर सलीम, सलमान अली, सवाई भट, वैशाली सामंत, कविता राम, रेशमा सोनवणे, राधा खुडे आदी कलाकारांनी त्यांच्या गीतांना स्वर दिले.
Shair Pranay Sutlej फक्त गीतकार म्हणूनच नव्हे, तर गझलकार म्हणूनही प्रणय सतलज यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. उस्ताद नसीम नागपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गझलचे धडे घेतले आणि दिल्ली, मुंबई, हैदराबाद, रायपूर, कलकत्ता अशा आदी शहरांतील मुशायरांमध्ये आपल्या शब्दांची जादू दाखवली. फैजान ताज यांची अनेक लोकप्रिय गीतेही प्रणय सतलज यांच्या लेखणीतून साकारली आहेत. लवकरच मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांची नवी गीते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रणय यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना राष्ट्र गौरव २०२३ पुरस्काराने सन्मानित केले तर महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२४ प्रदान केला. पुणे कला विकास संस्थेच्या प्रतिष्ठित कविरत्न पुरस्कारासह शेकडो पुरस्कार त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. संघर्षातून उभा राहिलेला हा शब्दांचा योद्धा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.