नवी दिल्ली,
SIR in Maharashtra from May 30 भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून, ३० मेपासून घराघरांत जाऊन मतदार पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे.या मोहिमेसाठी देशभरातील ३.९४ लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) थेट मतदारांच्या घरी भेट देणार आहेत. त्यांना ३.४२ लाख बूथ लेव्हल एजंट (BLA) मदत करणार असून, सुमारे ३६.७३ कोटी मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, दिल्ली, ओडिशा, उत्तराखंड आणि इतर अनेक राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया केवळ सरकारी यंत्रणेपुरती मर्यादित नसून त्यात मतदार, राजकीय पक्ष आणि निवडणूक अधिकारी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी राजकीय पक्षांना बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा आयोगाचा विश्वास आहे.३० मे ते १४ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष सर्वेक्षणाची प्रक्रिया पार पडणार असून, मतदार यादीचा मसुदा ५ जुलै ते २१ ऑक्टोबरदरम्यान प्रसिद्ध केला जाणार आहे.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता देशातील बहुतांश भागात हा तिसरा टप्पा राबवला जात आहे. या भागांतील हवामानाचा विचार करून तेथील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. यापूर्वीच्या दोन टप्प्यांत १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे ५९ कोटी मतदारांचा समावेश करण्यात आला होता. आता तिसऱ्या टप्प्यातील या व्यापक मोहिमेमुळे देशातील मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.