वेध,
नीलेश जोशी,
student-suicides : जगातील सर्वात तरुण देश अशी भारताची ओळख. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 65 टक्के लोकसंख्येचे वय 35 वर्षांपेक्षा कमी तर देशाचे सरासरी वय केवळ 29 वर्षे इतके आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग क्षेत्रांसह अनेकानेक विषयांवर भारतीय तरुणांनी आपले वर्चस्व वेळोवेळी निर्विवाद सिद्ध केले. एकीकडे जागतिक स्तरावर ही अभिमानास्पद बाब असली, तरी दुसरीकडे देशांतर्गत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ ही सामाजिक चिंता वाढविणारी आहे.

नुकताच राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने ‘अपघाती मृत्यू आणि आत्महत्या-2024’ हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक म्हणावे लागेल. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या आकडेवारीनुसार देशात 2020 साली 12 हजार 556 इतक्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशात झालेल्या एकूण आत्महत्यांच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची टक्केवारी 8.2 इतकी होती. 2021 साली 13 हजार 89, 2022 साली 13 हजार 44, 2023 साली 13 हजार 892 तर 2024 साली 14 हजार 488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद या अहवालात आहे. 2024 साली एकूण आत्महत्येच्या तुलनेत 8.5 टक्के इतक्या आत्महत्या विद्यार्थ्यांच्या आहेत. ही आकडेवारी निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल. त्यातही विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची सर्वाधिक 1909 घटना महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालातील आकडेवारीवरून दिसून येते.
महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू यांचा क्रम लागतो. विद्यार्थी आत्महत्यांपैकी जवळपास 43 टक्के आत्महत्या या 4 राज्यात घडल्याचे दिसून येते. नुकताच दहावीचा निकाल लागला. या निकालात बहुतांश विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले तर काहींना अपेक्षित यश गाठता आले नाही. अकोला जिल्ह्यातील एका घटनेमुळे आता यशाची व्याख्या देखील कळेनाशी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिकणाèया एका विद्यार्थ्याला 67 टक्के मिळाले. खरं म्हणजे ही टक्केवारी प्रथम श्रेणीची पण या विद्यार्थ्याने निकालानंतर एका जलाशयात उडी मारून आत्महत्या केली. मोबाईलवरील स्टेटसमुळे त्याला अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा यश-अपयश, ज्ञान प्राप्ती- शिक्षण या सर्व बाबीचे समीक्षण आणि विद्यार्थ्यांचे समुदेशन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
शिक्षण हे आता ज्ञानप्राप्तीचे साधन राहिले नसून ते आता स्पर्धेचा आखाडा झाल्याचे चित्र आहे. शिक्षण व्यवस्था ही पोटार्थी होत असल्याचे दिसून येते. अगदी शिशू अवस्थेपासून शाळा (कॉन्व्हेंट), शिकवणी, एक्स्ट्रा क्लास, विशेष वर्ग (अदर अॅक्टिव्हिटी) या चक्रात विद्यार्थी अडकतो अन् मग स्वयं अध्ययन, आवडीचे विषय, खेळ आदी बाबी त्याच्या आयुष्यातून बाद होतात. मग उरते ती केवळ मार्क आणि टक्केवारीची स्पर्धा. या दृष्टचक्रात अडकल्यामुळे, सतत वाढत असलेल्या दबावामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखी समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे.
वास्तविक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, वाङ्मय अशा क्षेत्रातही उत्तम ज्ञान, संधी आहेत. देशाच्या विकासात प्राध्यापक, संशोधक, तज्ज्ञ आदींनी या विषयाद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. या विषयासह विविध विषयांचे ज्ञान असणाèयांची गरज भविष्यातही आहेच. पण दुर्दैवाने पालक आणि विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षा, इंजिनीअरिंग, वैद्यकीय क्षेत्र यालाच भविष्य समजू लागले. यातच जीवनाचे सार्थक आहे. या कल्पनेच्या बाहेर विद्यार्थी जाऊ शकत नसल्याने विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था विचित्र होत आहे. गत काही वर्षांत समाजमाध्यमांचा प्रभाव सतत वाढतो आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक यावर इतरांचे यश, आलिशान जीवन, परदेशी शिक्षण, उच्च पगार यांचे आकर्षक चित्र दिसते. त्यामुळे अनेकदा स्वतःतील न्यूनगंड वाढतो. ‘मी मागे पडतोय’ ही भावना मानसिक तणाव वाढवते.
वास्तविक एका परीक्षेतील अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट हा कधीच असू शकत नाही. पण दुर्दैवी घटनांमध्ये सतत होणारी वाढ ही भयावह आहे. आत्महत्येचा विचार सुरू असणाèयाच्या मनात प्रचंड द्वंद्व सुरू असतं, आत्महत्येचा विचार केवळ निकोप संवादातून दूर सारला जाऊ शकतो, असेही असे तज्ज्ञांचे मत आहे. खरं म्हणजे मनमोकळा संवाद हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. दुर्दैवाने गत काही वर्षात कुटुंबातील संवाद कमी होत असल्याचे दिसून येते. याची अनेकानेक कारणे असली तरी कुटुंबातील निकोप संवाद वाढणे, अधिक दृढ होणे हे विद्यार्थी आत्महत्येसह विविध समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक आहे.
9422862484