प्रयागराज,
up storm havoc उत्तर प्रदेशात बुधवारी रात्री आलेल्या भीषण वादळाने मोठा हाहाकार माजवला. मिर्झापूर, भदोही, प्रयागराज, फतेहपूर, हरदोई, कानपूर देहात आणि कौशांबीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आणि मातीची घरे जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक आपत्तीत राज्यभरात तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
वादळामुळे अनेक भागांतील वाहतूक विस्कळीत झाली, तर वीजपुरवठाही खंडित झाला. अनेक घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले. काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
भदोही जिल्ह्यात वादळाचा सर्वाधिक फटका बसला. येथे १५ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. तसेच १६ जनावरांचाही मृत्यू झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हवामान अचानक बदलले आणि प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झाडे आणि विजेचे खांब कोसळले.
भदोहीच्या सुरियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरगसेनपट्टी येथे एका घरावर झाड कोसळल्याने एका महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. औराई परिसरात झाडाखाली उभ्या असलेल्या काही नागरिकांचाही मृत्यू झाला. जिल्हाधिकारी शैलेश कुमार यांनी १५ जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बीएचयू, वाराणसी येथे हलवण्यात आले आहे.
प्रयागराजमध्ये वादळामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा राज्यातील सर्वाधिक आहे. मिर्झापूर जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.up storm havoc त्यापैकी सात जणांचा मृत्यू मिर्झापूर सदर तालुक्यात, तर तीन जणांचा मृत्यू चुनार तालुक्यात झाला.
याशिवाय फतेहपूर जिल्ह्यात नऊ, हरदोई जिल्ह्यात दोन, तर कानपूर देहात आणि कौशांबी जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू असून नुकसानग्रस्त भागांमध्ये वीजपुरवठा आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.