बीजिंग,
us and china अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. जगातील दोन महासत्तांच्या नेत्यांमधील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे.
बीजिंगमधील 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल' येथे शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांचे औपचारिक स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी आपुलकीने हस्तांदोलन केले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या शिष्टमंडळातील सदस्यांची ओळख चिनी नेतृत्वाशी करून दिली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांचाही या बैठकीत समावेश होता. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ऑनर गार्डने ट्रम्प यांना औपचारिक मानवंदना दिली.
औपचारिक स्वागतानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू झाली. चर्चेच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत त्यांना “महान नेते” असे संबोधले. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ट्रम्प म्हणाले की, त्यांची आणि शी जिनपिंग यांची दीर्घकाळापासून मैत्री असून अनेक कठीण प्रसंगी दोन्ही देशांनी संवादातून मार्ग काढला आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेतील अनेक मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक नेते चीनसोबत व्यापार वाढवण्यास उत्सुक आहेत आणि त्यासाठीच ते या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. त्यांनी या बैठकीला ऐतिहासिक संबोधत अमेरिका आणि चीनमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील, असा दावा केला. “तुमचा मित्र असणे हा माझ्यासाठी सन्मान आहे,” असेही ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना उद्देशून म्हटले.
यावेळी शी जिनपिंग यांनीही चीन-अमेरिका संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यांनी सांगितले की, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनने प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार म्हणून काम केले पाहिजे. जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलत असून अशा काळात दोन्ही देशांमधील स्थिर संबंध संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात “थुसिडायडिस ट्रॅप” या संकल्पनेचाही उल्लेख केला. उदयोन्मुख शक्ती आणि विद्यमान महासत्ता यांच्यात संघर्षाची शक्यता वाढते, या सिद्धांताचा संदर्भ देत त्यांनी अमेरिका आणि चीन संघर्ष टाळून सहकार्याचा नवा मार्ग शोधू शकतात का, असा प्रश्न उपस्थित केला. दोन्ही देशांनी जागतिक आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाऊन जगात स्थैर्य निर्माण करण्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चीन आणि अमेरिका यांच्यात मतभेदांपेक्षा समान हितसंबंध अधिक असल्याचे सांगत शी जिनपिंग म्हणाले की, एका देशाचे यश दुसऱ्यासाठी संधी ठरू शकते. सहकार्यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल, तर संघर्षामुळे नुकसान होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीदरम्यान ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राजभोजाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून २०१७ नंतरचा हा त्यांचा पहिला चीन दौरा आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बुसान येथे झाली होती.दरम्यान, ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी चीनमधील अमेरिकन दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत अमेरिका-चीन संबंधांशी संबंधित काही संवेदनशील मुद्द्यांबाबत चीनची भूमिका स्पष्ट केली होती.us and china तैवान प्रश्न, लोकशाही आणि मानवाधिकार, चीनची राजकीय व्यवस्था आणि विकासाचा हक्क या चार मुद्द्यांना चीनने “लक्ष्मणरेषा” असल्याचे म्हटले होते.
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील ही बैठक अमेरिका-चीन संबंधांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते. व्यापार, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक स्थैर्य या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देश पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.