काँग्रेसमध्ये एकमत; व्ही. डी. सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री!

    दिनांक :14-May-2026
Total Views |
तिरुवनंतपुरम,
V. D. Satheesan CM of Kerala केरळच्या राजकारणात अखेर मुख्यमंत्रीपदावरील सस्पेन्स संपला असून काँग्रेसने व्ही. डी. सतीशन यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जवळपास नऊ दिवस चाललेल्या चर्चांनंतर आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर अखेर सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेस नेतृत्व राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) दमदार कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवले. १४० सदस्यीय विधानसभेत आघाडीने १०२ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांचीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चा होती. मात्र अखेरीस पक्षाने सतीशन यांच्यावर विश्वास दाखवला.
 
 
satishan
सतीशन यांनी निवडणुकीपूर्वी केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्ताधारी डाव्या आघाडीविरोधात यूडीएफची आक्रमक भूमिका मांडण्यात ते आघाडीवर होते. विविध प्रशासकीय आणि राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सरकारवर सातत्याने टीका केली होती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्ष नेतृत्वात त्यांची मजबूत प्रतिमा तयार झाली.परवूर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या सतीशन यांनी यंदाही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सलग सहाव्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला. त्यांनी सीपीआयचे उमेदवार ई. टी. टायसन मास्टर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. गेल्या २५ वर्षांपासून ते परवूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १९६४ मध्ये कोचीजवळील नेटूर येथे जन्मलेल्या सतीशन यांनी वकिली व्यवसायातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. विद्यार्थी राजकारणातून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि नंतर युवक काँग्रेस तसेच काँग्रेस संघटनेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याने केरळच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.