एक दिवस मी क्रिकेटपासून दूर जाईन!

शतकानंतर विराट झाला भावूक

    दिनांक :14-May-2026
Total Views |
रायपूर,
Virat gets emotional after his century विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या शानदार फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना विराटने नाबाद १०५ धावांची अप्रतिम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या दमदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, या शतकानंतर विराटने केलेल्या एका भावनिक वक्तव्याने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला की, एक दिवस असा येईल जेव्हा हे सगळं संपेल आणि क्रिकेटपासून दूर जाईल. त्यामुळे मैदानावर मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 

Virat gets  
 
या शतकापूर्वी विराट सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. टी-२० कारकिर्दीत दुसऱ्यांदाच त्याच्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, धावा होत नसल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता, कारण त्याला आपल्या खेळात कोणतीही कमतरता जाणवत नव्हती. मात्र, वैयक्तिक शतकापेक्षा संघासाठी सामना शेवटपर्यंत नेणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
 
 
दबावाबद्दल विचारले असता विराटने सांगितले की, दबाव माणसाला अधिक नम्र बनवतो आणि खेळ सुधारण्यास मदत करतो. काही सामने अपेक्षेप्रमाणे न झाल्यास मनात अस्वस्थता निर्माण होते, पण त्यातूनच अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळते. दबावाच्या क्षणी स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान त्याला आवडते, असेही तो म्हणाला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराटने क्रिकेट हीच आपली सर्वात मोठी आवड असल्याचे सांगितले. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान असल्याची भावना त्याने व्यक्त केली. मैदानावर प्रत्येक वेळी सर्वस्व झोकून देण्यामागेही हेच कारण असल्याचे विराटने स्पष्ट केले.