मोठी बातमी...दिल्लीत आता ‘वर्क फ्रॉम होम!

आठवड्यातून दोन दिवस आवश्यक

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Work from home started in Delhi दिल्ली सरकारने वाढती वाहतूक कोंडी आणि इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. आता दिल्ली सरकारचे सर्व कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस घरून काम अर्थात ‘वर्क फ्रॉम होम’ करणार आहेत. याशिवाय, सरकारी बैठकींपैकी तब्बल ५० टक्के बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सरकारने केवळ शासकीय विभागांपुरते हे बदल मर्यादित न ठेवता, खासगी कंपन्यांनाही शक्य तितक्या प्रमाणात अशा पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 started in Delhi
 
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिका कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करत आहेत. गर्दीच्या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी व्हावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.सरकारी वाहनांच्या वापरावरही सरकारने मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेट्रोलच्या कोट्यात २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तसेच पुढील सहा महिन्यांपर्यंत कोणतीही नवीन सरकारी वाहने खरेदी केली जाणार नसल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
 
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून विशेष उपक्रम हाती घेतले जात आहेत. दिल्लीत आठवड्यातून एकदा ‘कार-फ्री डे’ पाळण्याचे आवाहन केले जाणार असून, ‘मेट्रो डे’ देखील साजरा करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळवण्यासाठी २९ सरकारी वसाहतींमध्ये ५८ विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याचे आवाहन केले होते. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एस्कॉर्ट वाहनांची संख्या कमी करण्याचा साधा संदेश दिला आहे.