नवी दिल्ली
uddhav-thackeray-lawyer : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला चांगलेच फटकारले. ‘तुमचे नेते न्यायालयाबद्दल जी विधाने करत आहेत ती शोभनीय नाहीत, त्यांना आवरा,‘ अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या वकिलांना खडे बोल सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
नेमका वाद काय झाला?
ठाकरे गटाचे वकील ॲड. देवदत्त कामत यांनी ‘आम्ही 3 वर्षांपासून निर्णयाची वाट पाहत आहोत, यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी,‘ अशी विनंती न्यायालयाला केली. यावर सरन्यायाधीशांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘आम्ही सुनावणीच्या तारखा निश्चित करू, पण विलंबासाठी न्यायालयावर बेजबाबदार आरोप करणे अयोग्य आहे. आम्ही रोज दुपारी 4 वाजेपर्यंत काम करतो, आम्ही रिकामे बसलो आहोत असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे,‘ असे सरन्यायाधीशांनी ठणकावून सांगितले.
कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
तुमचे नेते कोर्टाबाबत काहीही भाष्य करत आहेत, अशा शब्दांत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी ठाकरे गटाच्या विधानांवर आक्षेप घेतला. ‘कोर्टावर कामाचा मोठा ताण आहे, अशा स्थितीत विलंबाचा आरोप करणे चुकीचे आहे,‘ असे त्यांनी नमूद केले. प्रलंबित प्रकरणांच्या ओझामुळे आता ही सुनावणी कोर्टाच्या सुट्टीनंतर 30 जुलै रोजी होईल.