वर्धेत महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

    दिनांक :15-May-2026
Total Views |
वर्धा,
congress-protest-against-inflatio : पेट्रोल, डिझेल तसेच दूधाच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, घरगुती बजेटचा ताळमेळ बसवताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवन अधिक कठीण होत असल्याने काँग्रेसच्या वतीने आज वर्धेत आंदोलन करण्यात आले.
 
 

cong 
 
 
 
“बहोत हो गई महंगाई की मार” या घोषणेसह महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत आहे. तसेच दूधाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन खर्चामध्ये मोठी वाढ झाली असून गृहिणींवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
 
 
महागाई नियंत्रणात आणण्यात बीजेपी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. केंद्र सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात व्यस्त असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
 
 
हे आंदोलन वर्धा शहरातील स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या पेट्रोल पंप समोर करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
 
यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. अरुणा धोटे यांच्या नेतृत्वाखाली कमल डगवार, संगीता ठवळे, लता नंदरधने, दमयंती घोडमारे, ऋतुजा भोयर, दामिनी कुमरे, कल्याणी पाटील, वनिता मरसकोल्हे तसेच महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारला इशारा देण्यात आला की, महागाई कमी करण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जनतेच्या हक्कासाठी महिला काँग्रेस सातत्याने संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.