35 हजारांचा मुद्देमाल ताब्यात, कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
गडचिरोली,
Counterfeit HTBT Cotton Seeds Seized चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत संशयित कापूस बियाण्यांची 37 पाकिटे, सीलिंग मशीन तसेच कोरे पॅकेट असा एकूण 35 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Counterfeit HTBT Cotton Seeds Seized 14 मे रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून रामसागर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पुष्पा, बलवान व मालामाल या वाणांच्या संशयास्पद कापूस बियाण्यांची 37 पाकिटे आढळून आली. यासोबतच बियाणे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सीलिंग मशीन आणि कोरे पॅकेटही जप्त करण्यात आले. जप्त बियाण्यांची किंमत 33 हजार 937 रुपये असून सीलिंग मशीनची अंदाजे किंमत 1 हजार 500 रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले. या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार, रा. रामसागर यांच्या विरोधात चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) चेतन चलकलवार यांनी तक्रार दिली आहे. आरोपीविरुद्ध बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.