नियोजित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करा: डॉ. प्रवीणकुमार देवरे

*जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

    दिनांक :15-May-2026
Total Views |
बुलढाणा, 
pravinkumar-deore : जिल्ह्यात आगामी मान्सून काळात उदभवणार्‍या संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ मे रोजी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातू मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली.
 
 
 
k
 
 
 
या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्व यंत्रणांच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेऊन, आराखड्यातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मान्सून काळात जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकार्‍याने मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
 
 
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि विविध विभागांचे जिल्हा प्रमुख दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देताना जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले की, १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत. प्रत्येक विभागाने आपापले आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करावी. तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बचाव साहित्य जसे की बोटी, लाईफ जॅकेट व इतर साधनसामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करून तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपलब्ध होऊ शकतील असे पोकलेन, जेसीबी, जनरेटर यांसारखी यंत्रसामग्री पुरवणारे कंत्राटदार आणि मोठ्या प्रमाणावर किराणा माल सप्लाय करणारे दुकानदार यांची यादी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
 
पूरग्रस्त आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये सतर्कता वाढवण्यासाठी तहसील स्तरावर २० मेपूर्वी सूक्ष्म आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपर्क तुटणार्‍या गावांमध्ये मे महिन्यातच अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुरवठा विभागाला देण्यात आले असून, आरोग्य विभागाने सर्पदंश व साथरोगावरील औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. धरण क्षेत्रातील गावांना पाण्याच्या विसर्गाबाबत आगाऊ सूचना देण्यासाठी दवंडी व पोलीस यंत्रणेचा प्रभावी वापर करावा, असेही बैठकीत सांगण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासनातील प्रत्येक घटकाने आपल्या जबाबदारीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले.