६० हजार वर्षांपूर्वी आदिमानव करत होते ‘रूट कॅनाल'

वैज्ञानिकांच्या शोधाने खळबळ

    दिनांक :15-May-2026
Total Views |
मॉस्को,
Early Humans Were Performing Root Canals निअँडरथल मानवांविषयी आजवर असलेली धारणा बदलून टाकणारा एक महत्त्वाचा शोध सायबेरियातील गुहेत समोर आला आहे. इतिहासात निअँडरथलना केवळ शिकारी आणि गुहेत राहणारे आदिमानव म्हणून पाहिले जात होते. मात्र, नव्या संशोधनातून ते वैद्यकीय ज्ञान आणि उपचारपद्धतींमध्येही प्रगत होते, असे संकेत मिळत आहेत. सुमारे ६० हजार वर्षे जुन्या एका दाताच्या तपासणीत संशोधकांना असे पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे त्या काळातही दातांवर शस्त्रक्रियेसारखे उपचार केले जात असल्याचा दावा केला जात आहे. सायबेरियातील चागिर्स्काया गुहेत उत्खननादरम्यान संशोधकांना निअँडरथल मानवाचा खालच्या जबड्यातील दात सापडला. या दाताची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये खोलवर छिद्र आणि त्याभोवती धारदार अवजारांनी तयार झाल्यासारख्या खुणा दिसून आल्या. सुरुवातीला हा साधा दाताचा क्षय असल्याचे वाटत होते, मात्र पुढील तपासणीत दातातील संक्रमित भाग जाणीवपूर्वक खरवडून काढल्याचे स्पष्ट झाले.
 

Root Canals 
१० ते १५ हजार वर्षांपूर्वी दंतउपचार सुरू
संशोधकांच्या मते, त्या निअँडरथल व्यक्तीला तीव्र दातदुखी आणि संसर्गाचा त्रास असावा. वेदना कमी करण्यासाठी जमातीतील एखाद्या सदस्याने दगडी अवजारांचा वापर करून दातामधील खराब भाग काढून टाकण्याचा प्रयत्न केला असावा. ही प्रक्रिया आधुनिक काळातील रूट कॅनाल उपचारांसारखी असल्याचे मानले जात आहे. आजवर आधुनिक मानवाने सुमारे १० ते १५ हजार वर्षांपूर्वी दंतउपचार सुरू केल्याचे मानले जात होते. मात्र, या नव्या शोधामुळे निअँडरथल मानवांनी त्याही आधी दातांवर उपचार करण्याचे तंत्र आत्मसात केले होते, असा निष्कर्ष समोर येत आहे. यामुळे त्यांच्याकडे केवळ शिकार आणि साधननिर्मितीचेच नव्हे, तर मानवी शरीर आणि वेदनांबाबतचे ज्ञानही होते, असे दिसून येते.
संशोधनादरम्यान वैज्ञानिकांनी आधुनिक दातांवर दगडी अवजारांनी प्रयोगही केले. त्यात एक कुशल व्यक्ती अल्प वेळात दाताच्या बाहेरील थरात छिद्र पाडू शकते, हे स्पष्ट झाले. त्यामुळे निअँडरथल मानवांकडे अशा प्रकारचे कौशल्य असण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. या शोधाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील सामाजिक नातेसंबंध आणि परस्पर विश्वास. भूल किंवा आधुनिक औषधे नसताना दातावर अशी प्रक्रिया करणे अत्यंत वेदनादायक ठरू शकते. त्यामुळे उपचार करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आणि वेदना सहन करणे, ही त्या समाजातील परस्पर सहकार्याची आणि समजुतीची पातळी दर्शवणारी बाब असल्याचे संशोधकांचे मत आहे. या संशोधनामुळे निअँडरथल मानवांविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते केवळ आदिम आणि रानटी नव्हते, तर बुद्धिमान, कौशल्यपूर्ण आणि एकमेकांची काळजी घेणारे समाजघटक होते, असे या शोधातून अधोरेखित होत आहे.