वर्धा,
Financial Fraud बँकेच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आलेली एपीके फाईलची लिंक उघडणे एका सेवानिवृत्त कर्मचार्याला चांगलेच महागात पडले. संबंधित फाईल उघडताच बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये ठगबाजाने काढून फसवणूक केली. ही घटना हनुमाननगरात उघडकीस आली. नाव समशेर असले तरी सायबर गुन्ह्यात हा शेर अडकून गेला.
Financial Fraud हनुमान नगर येथील समशेर राजमोहम्मद शेख (५९) हे प्रकल्प कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांचे मगनवाडी भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यात जीपीएफचे १५ लाख रुपये जमा होते. त्यापैकी ११ लाख ८० हजार रुपये त्याने खर्च केल्याने खात्यात ३ लाख ८७ हजार १८७ रुपये शिल्लक होते. ४ मे रोजी त्यांना व्हॉट्सअॅपवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने युनो एसबीआय एपीके फाईलची लिंक प्राप्त झाली. ती लिंक उघडल्यानंतर आपले युनो अॅप बंद झाले आहे. ते सुरू करण्यासाठी दिलेल्या सुचनांचे पालन करा, असा संदेश दिसला. त्यानुसार त्यांनी मोबाईल क्रमांक, एटीएम कार्डचे शेवटचे चार अंक आणि इतर माहिती भरून अपलोड केली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एकामागून एक संदेश येऊ लागले आणि त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ७५ हजार रुपये ऑनलाइन काढण्यात आले. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे.